Friday, July 11, 2008

सर

सर सांगुन आली।
घर लांघुन गेली।

मी हसलो एकदा
व्यथा सोडुन गेली।

पाप राहीले तसेच
गंगा वाहुन गेली।

लागली आग उरी
गावे पेटुन गेली

राहीलो जिथल्या तिथे
गर्दी रेटुन गेली।

--- प्रशेन ह क्यावल

बरी

पेटलेली वाट जिवघेणी बरी होती।
शेवटची मिठी चोरटी बरी होती।

वाटायचो सम्राट माझाच मी मला,
ती जवनीची मुजोरी बरी होती।

श्वास श्वासच होते, हुंदके नाही
कालची तेव्हाची हवा बरी होती।

मी नाही तुझ्याशी लढु शकत मित्रा,
तुझी आधीची ती दुश्मनी बरी होती।

इतके कसे रंग मी सांग भरु आता?
माझ्यासाठी रक्ताची रांगोळी बरी होती।

मी न रहीलो कुणाचा जवळीक झाल्यावरी
आपल्यातील पुर्वीची दुरी बरी होती।

शब्द आसवे माझी अन लेखणी रक्ताची
पण मैफीलीत दाद मिळते: "बरी होती!"

---- प्रशेन क्यावल

रुंद

शेवटचा उसासा रुंद होता।
तिला जीव जाळण्याचा छंद होता।

मदत मागु कुणाची गावात या
इथे हरेक दरवाजा बंद होता।

मी कुणाशी बोलु इथे तत्वज्ञान
जिथे गाव साराच मंद होता।

तु आली होतीस माझ्या चितेवरी
हवेत ओळखीचा तुझा गंध होता।

व्यर्थ गेले प्रयत्न शिकवायचा माणुसकी
प्रत्येकजण तिथे कत्तलीत दंग होता।

स्पर्शातील कशी स्पंदने जाणिवांची तुम्हाला
तुम्ही तेव्हा तुमच्याच मस्तीत धुंद होता।

मारले त्यांनी त्याला देवळात बसवुन
साय्राच गावात तो साय्रांनाच वंद्य होता।

--- प्रशेन ह क्यावल

Wednesday, July 09, 2008

अविर्भाव

त्यांचा मला मारण्याचा अविर्भाव मुद्दाम आहे।
मीही नाही साधाभोळा तेव्हढाच मी उद्दाम आहे।

सारेच ओळखतील मला गावात त्या
मी अजुनही तिथे, तेव्हढाच बदनाम आहे।

केले हलाल त्यांनी झटक्यात शेकडोंना
हटके न कुणी त्यांना, त्यांच्या मुखी राम आहे।

झिडकारले ज्यांनी होते हारल्यावरती मला
जिंकल्यावरी तयांचे, माझ्याकडे काम आहे।

का रडता उगीच तुम्ही माझ्या मरणावरी
मी खुशाल आहे, इथे आराम आहे।

---- प्रशेन क्यावल

निसर्ग

ही अशी हवा कुंद कुंद।
चाखतो मी पाऊस बुंद बुंद।

पसरली धुक्याची साय दाट
झाली धारा मदिरेत धुंद धुंद।

प्रणय झाय्रांचे जारी जाहले
कर जवळ आता मिठी रुंद रुंद।

जाहली बेफाम बिलगुन लतावेल
प्रणयात निसर्गाच्या गाव सुंद सुंद।

---- प्रशेन क्यावल

बढाई

बढाई धुरंधरांची खरी होती।
रास निष्पाप मुदर्यांची खरी होती।

तिला जावेच लागणार होते
तिची माझ्याशी यारी खरी होती।

भुलले कोणीच ना त्यांच्या बनावाला
माझी मृत्युवरी दावेदारी खरी होती।

नाही पुरा कुणाचाच जोगवा इथे
अहो, त्यांची लाचारी खरी होती।

कसे बांधतील माझ्या शब्दांना
माझी कोंडलेली प्रतिभा खरी होती।

--- प्रशेन क्यावाल

उपभोग

तुझ्या ओठांची साय ओठी लागली।
मी मलाच आता विसराया लागली।

उधळीत जा माझ्यावरी तू चुंबने
नुकतेच मी गोळा कराया लागली।

फिरु दे बेफाम हात शरीरावरी
मी कुठे जगाची तमा बाळगाया लागली।

मिसळ श्वास तुझा श्वासात माझ्या
धुमसती आग कधीची अता पेटाया लागली।

तुला उगीच वाटते तू मला उपभोगीले
मीच तुझ्या भोगात उमलाया लागले।

--- Prashen H Kyawal

Wednesday, December 05, 2007

तू अन मी

तू तुझ्या ऊंच प्रासादी
बसलास झुंबराखाली
मी माझीच वळकट बांधुन
उघडाच ऊंबराखाली

तुझ्या स्वप्नांच्या इमल्यांना
सत्याचे मजले चढले
माझेच पोट खपाटीला
अन पाय पाताळी भिडले

सोन्याने लदबदल्या हाती
तुझ्या ऊंच मद्याचे पेले
मी झूरतो थेंबासाठी

पाऊस आले नी गेले

--- प्रशेन ह. क्यावल

सख्या

काय सांगू सख्या

तुला मझी व्यथा

तुझाच ध्यास मजला

इथे सदा सर्वदा


तु कोणत्या मध्यरात्री

गेला असा अवचित

का देऊन याद गेलास

का दिलीस ही व्याधा


ती यमुनेची झुळझूळ

ते वासराचे दुडदूडणे

आठवते सगळे तुजला

परी आठवेना राधा


जीव जातो जरुर

तुटती ह्रुदयाची पीर

तरी लावते हूरहूर

जीवघेणी कान्ह्याची बाधा

--- प्रशेन ह. क्यावल

Thursday, October 18, 2007

ऋणे

आता सगळे काही
आहे जुने जुने
उरले फक्त आता
क्षण हे सुने सुने

मी बोललो प्रेमाने

तरी आघातच होतो
मी दिले कितीही
तरी त्यांना उणे उणे

मी किती बहाणे
करु माझ्या सोबतीच?
जरी नाकारले तरीही
ही गतजन्मीचीच ऋणे

Saturday, September 29, 2007

विरहकाळ

स्फोट आहे वेदनेचा, विरहाचा अग्निलोळ आहे।
पेटलेला मनात मझ्या, तव आठवणींचा जाळ आहे।

स्तब्ध आहेत दाहिदिशा, अन् भकास विश्व सारे,
सरता ना सरतो लवकर, विरहाचा हा काळ आहे।

मनाच्या या सागरात, तव आठवणींच्या विराट लाटा,
रोंरावत, घोंघावत फिरते, तुझ्या प्रेमाचे वादळ आहे।

दिवसा पेटलेले सुर्यबिंब, रात्री उदास ते चंद्रबिंब,
विरहाच्या क्षणात या, दुश्मन हे आभाळ आहे।

आठवतो सागरकिनारी, तुझ्या हास्याचा खळ्खळाट,
पण उरली फक्त मंद हवा, अन् सोबतीला प्रवाळ आहे।

पांघरुन स्वप्न तुझे

पांघरुन स्वप्न तुझे, मी उभा अनाधार।
पायाखाली नसे जमीन, अधांतरी बेकरार।

रात्र ढळे, सुर्य उगे, मला काय त्याचे?
आंधळा मी, डोळ्यांसमोरी मला दिसे अंधार।

वैराण वाळवंट, रेताड आयुष्य गेले,
निर्झराचा कुठे खळाळ? कुठे ती गेली बहार?

सोडून मज गेलीस, दोष तुझा ग नाही,
माझेच पाप आहे, माझीच ही असे हार।

ध्येय, मंजिल झुठ सारे, व्यर्थ शब्दांचे डोलरे
जगायचे म्हणून जगणे, हेच जगण्याचे सार।

पोकळ तत्व सारे, उगाच माजविती स्तोम,
सत्य एक स्वार्थ फक्त, सत्य भागरीचा आकार।

नाही कुणाला सुख इथे

नाही कुणाला सुख इथे, रित जगाची अजब आहे।
दु:खात ती जळते तिथे, इथे सुखात मी खाक आहे।

शिवला न विचार पापांचा, खुडतांना निष्पाप कळी,
हात इकडे करु नको, खबदार! मी आग आहे!

घाबरुन का पळतोस दुर, भविष्याच्या ओढीने
विद्रुप ज्याला काल केले, तोच तुझा मी आज आहे।

बघतेस काय होऊन स्तब्ध, घे धरून सत्वर
काल तु जो सोडला होतास, तोच माझा हाथ आहे।

ठिक आहे आलीस परतूनी जरी कितीक युगाने
शेवटी जी आली तुजला, तीच मी जाग आहे!

तु कधी

तु कधी स्वत:ला हसतांना पाहिलेस का?
तु कधी गालांवर गुलाब फुलतांना पहिलेस का?

तु कधी देह तुझा कमनिय तो पाहिलास का?
तु कधी वेल इतली शेलटी पहिलीस का?

तु कधी भुवयास तुझ्या पाहिलेस का?
तु कधी धनुष्य असला पाहिलास का?

तु कधी नजर तुझी पाहिलीस का?
तु कधी तीर धारदर इतका पाहिलास का?

तु कधी डोळ्यांसमोरी केस घेऊन पाहिलेस का?
तु कधी दिवसाच रात्र पाहिलीस का?

तु कधी स्वत:ला लाजतांना पाहिलेस का?
तु कधी लाजलेला चंद्र पाहीलास का?

जीवनसंचित

कळलेच ना माझे मला,
कोठूनी मी कोठे आलो?
माझ्याच संगतीला,
मी आत कंटाळलो।

देऊ नकोस त्रास मजला
आणखी आता मृत्यो,
मी आताच जीवनाचे,
मढे हे ओढून आलो।

प्रथम जेव्हा लाविला मी
हात लेखणीला,
तेव्हाच आसवांशी,
नाते मी जोडून आलो।

आठवणी

तु आठवतेस, तुझा सहवास आठवतो।
श्वासात गुंतलेला, प्रत्येक श्वास आठवतो।

रसाळ, मधाळ, गोड, तुझ्या प्रेमाची चाखणी,
तुझ्या ओठांचा मध, त्या मधाचा सुवास आठवतो।

दिवसाच्या प्रत्येक क्षणाला, तव आठवणींच्या खाणाखुणा,
माझ्या हरेक आर्त हाकेला, तव सादेचा आभास आठवतो।

ग्रिष्माच्या या दुपारी, कोकीळेची विरहगाणी,
प्रत्येक आठवणींत तुझ्या, तो क्षण निरोपाचा खास आठवतो।

अमरप्रिती

मी रात्र लाजरी काळी
तू हसरा चंद्रमा।
तव स्पर्शाने दिली मजला
चांदण्यांची रिक्तिमा।

हरणांच्या पावलांनी
तू हसत यायचे।
तव स्पर्शाने फुलारून
मीही बहरुन जायचे।
मिलनात दोघांच्या या
सोडीच चांदण्या पाठ ना। मी रात्र....

तू न् मी ही आतुरलेलो
प्रकाशास दिवसाच्या।
दोघांच्या मिलनास त्या
प्रकाश पडद्या आडच्या
कानांत हळूच दिनकराच्या
लवकर यायला सांगना। मी रात्र...

दिसत जरी असलो सोबत
चालला तू उलट दिशेला।
सुर्य मावळती कडूनी
चंद्र उषेच्या कार्याला।
कर्तव्य संपेल तेव्हा तरी
सांग जवळ येऊ ना। मी रात्र....

रोजचीच चातकतृष्णा
रोजरोजचीच भेटगाठ।
विरहाच्या क्षणात रोज
नेहमीची तीच ओढ।
अमर ही प्रित अपुली
मानवा का जाणवेना! मी रात्र.....

Saturday, September 01, 2007

राख

माझ्या चितेसमोरी, जी मलाच दिसली होती।
ती नश्वरतेची खुण, माझीच राख होती।

मी धावलो कैफात, धुंदीत यशाच्या,
दिसली मला मदिरेत ती, आसवांची रांग होती।

झुंझार ज्या क्षणाला, तलवार मी उपसली,
समोरी सेना खडी ती, मज बांधवांची होती।

झिडकारणाय्रा दुनियेने मज सलाम ठोकला ज्यादिवशी,
डोळ्यात तिच्या दिसणारी मझीच व्यथा होती।

मी धावत्या यशात, होउन धुंद-फुंद,
जी अनाहुत केली, माझीच चुक होती।

कोसळ्लो ज्या क्षणी मी, गर्तेत अपयशाच्या,
झेलले जीने मजला, मझीच दुनिया होती।

कितीक दिवस जी जळली, माझीच चिता होती,
आकाशाकडे झेपावली ती, मझीच आग होती।

घ्यावी गरुडभरारी होउन राखपक्षी,
कोंब पुन्हा फुलावे, माझीच आस होती।

बाभळीचे दु:ख

एक दिवस पुन्हा गेला
पुन्हा एक रात्र गेली
मी अशीच उभी एकाकी
नदी आसवांची वाहून गेली।

अंग काटेरी माझे
वाय्रासही बोचते।
रंग काळेशार माझे
रात्रीलाच शोभते।
शुष्क पनांसवे जिंदगी
जगायचीच राहून गेली। एक दिवस.....

पायाखाली उजाड रान
मुंग्या अंगा लुचती।
निर्जल मातीवरील खडक
झुळकेरसशी खचती।
त्याची वाट बघता बघता
मी जायाचीच राहिली। एक दिवस...

मुळ माझे खोल आत
सोडवेना मायापाश।
जल देऊन थकली धरती
दोष देऊन मी कशास?
खडक सारे अंकुरले पण
मी बहरायचीच राहीली। एक दिवस....

काय ऎकवू मी तुम्हाला
गज़ल माझ्या दु:खांची?
दु:ख माझे असे ज्याला
सर नही कशाची।
बाभळीचे देणे दुनिया
बघता-बघता भुलून गेली। एक दिवस.....

प्रश्नचिन्ह

भिन्न नियम, चिन्हे, अर्थ,
उकार, विलांट्या, विराम जरी!


साय्रा भाषांत साम्य-
प्रश्नचिंन्हाचं असतच तरी!!

परंपरा

नसेल आम्हाला फुकाची
सुर्यतेची परंपरा
पण आम्ही....
काजवे नक्कीच नाही!

नसेल आम्हाला फुकाची
गरुडतेची परंपरा
पण आम्ही....
कावळे नक्कीच नाही!

नसेल आम्हाला फुकाची
सागरतेची परंपरा
पण आम्ही....
नल्या नक्कीच नाही!

अरे जारे बेईमानांनो,
आम्ही पण काही कमी नाही
आणि आम्ही नसलो तर.....
आमच्या शिवाय तुम्ही काहीच नाही.

जाळं

एक कोळी.....
घराच्या कोपय्रात, स्वत:च्या जाळ्यात!
जाळं...
म्रुत्युच्या साखळदंडांचं!
त्यात त्याच्या....
जगाचा तो राजा!

एक मुंगी......
अडकते जाळ्यात कधितरी!
घेतो घास.....
खेळवत तिला!

मरण आल्यावर.....
त्याच्याच जाळ्यात, दर्प विरतो!
सांगाडा बनून.....
अडकतो सापळ्यात त्याच्याच!

मुंग्यांच्या झुंडी.....
नेतात फरफटत!
त्याचं शरीर....
खातात सव्याज......
घेतात बदला!


--- प्रशेन ह. क्यावल

Wednesday, August 22, 2007

हातात हात दे तू

हातात हात दे तु, श्वासात श्वास दे तू।
नाते मनाचे मनासी, हलकेच जुळवून दे तू।

मी बावळा मुका प्रेमवेडा, काहीच मजला सखे बोलवेना,
भाषा मनाची मनाने समजूनी, सादेस साद दे तू।

तू ओढ माझी समजून घेना, तू मन माझे जाणून घेना,
सोडूनी लाजभीड, सर्वस्व माझ्या, मिठीत झोकून दे तू।

तुझा स्पर्श माझ्या जगण्याची उभारी, तुझे हास्य मझ्या चेहय्राची झळाळी,
मझी सर्व सुखे घेऊनी सखे, मला तुझी दु:खे दे तू।

मी तहानलेला तुझ्या प्रेमाचा, मी सदा भुकेला तुझ्या स्पर्शाचा,
आतुरलेल्या ओठांस माझ्या, तुझ्या ओठांचा जाम दे तू।

नाते नव्हे हे सखे क्षणांचे, असे हे बंधन युगानुयुगांचे,
ऊनसावली असो वा असो सुख-दु:ख, सदैव मज साथ दे तू ।

प्रणयप्रार्थना

तुला चुंबावे असे वाटते, तुला कुस्करावे असे वाटते।
भले थोरलेसे आयुष्य हे, तुला बघत बघत जावेसे वाटते॥

तुझा श्वास माझ्या श्चासत गुंते, तुझा हात माझ्या हातात गुंते,
मोकळ्या विखुरलेल्या केसांत तुझ्या, सदैव मज गुंतावसे वाटते।

तुझे दोन डोळे जणू नयनबाण, तुझा स्पर्श घेतसे माझे प्राण,
तुझ्या मदभय्रा नजरेतील अव्हान, मज पुन्हा पुन्हा पेलावसे वाटते।

मी मत्त वारा सुसाट बेभान, तु वेल नाजुक, लवलवती छान,
माझ्या हर स्पर्शास तुझे लाजणे, लाजुन चुर होणे बघावसे वाटते।

तुझ्या मिठीत मझ्या बिलगण्यावरी, तुझे धुंद होणे मद्य प्याल्यापरी,
तो पूर तोडीतो बंध सारे, पुरात त्या वाहून जावसे वाटते।

कणाकणात तुझ्या फुलतो हा धुमार, तुझे श्वास गाती, छेडीता प्रेमतार,
तुझ्या पेटण्याने पुरा पेटलो मी, पेटुनी पेटुनी खाक व्हावसे वाटते।

ओसरे पूर तो, निचरे पाणलोट, शोषुनी रस तुझा, श्रमले माझे ओठ,
ठेऊनी मर्मबंधात अमीट कामसुख, तुला बिलगुनी रहावसे वाटते।

वारसदार

कळ्यांचेही फुलतांन काटे बनतात
त्या भूमीचा मी वारसदार।
पहाटेचा रविकरही जेथे रक्ताची लालीमा घेतो
त्या क्षितिजाचा मी वारसदार।

पुर्वजांनी जो सुरु केला
त्या जिवघेण्या धर्मयुध्दाचा मी वारसदार।
धर्म.... जो त्यांनी दिला...
स्वार्थाचा... त्याचा मी वारसदार।

मी पण पेरत चाललोय
रक्ताळलेली बीजे, ओलसर मातीत
उद्या निघणाय्रा दानवी कोंबांचे,
तुम्ही... वारसदार।

मी अंध झालोय
द्रोपदी वस्रहरणात सक्षीदाराची भुमिका घेणाय्रा ध्रुतराष्ट्राप्रमाणे।
पण आहे वेळ थोडा अजुन,
ठरवा.... व्हायचय तुम्हाला या वारश्याचे वारसदार?

तू

तुच साय्रा जगात अन् तुच माझ्या मनात आहे।
तुच आहे सादेत माझ्या, तुच हर क्षणात आहे।

निळेभोर आकाश तुच, तु नदीचा खळाळ आहे,
फुलांचा सुगंध तुच, तुच पानापनात आहे।

इंद्रधनुचे रंग तुच, तु कडाडती वीज आहे,
तुच काळ्या ढगांत अन् तुच थेंबाथेंबात आहे।

लेखणीही तुच माझी, तुच माझा शब्द आहे,
तुच माझे काव्य अन् तुच शायरीत आहे।

तु नाही कोणीपरी, तु नाही विश्वसुंदरी,
तुच पण प्रेयसी माझी, तुच माझ्या ह्र्द्‍यात आहे।

मी

इथे मी, तिथे मी, जिथे तिथे मीच मी,
जलात मी, स्थळात मी, कष्ठी-पाषाणीही मी।

विश्व माझे विशाल, विशालतेत मीच मी,
ग्रहात मी, ताय्रात मी, धुळीतही मीच मी।

सुर्यबिंब दिसे, टिंबापरी मज,
बिंबात मी, टिंबातही मीच मी।

जे रुप तुझे, तेच रुप माझेही,
तुझ्या रुपात मी अन् माझ्यातही मीच मी।

कोण मी? कोण तु? पुन्हा पुन्हा प्रश्न पडे,
वाटे त्या अम्रुताचा, पुत्र तु, पुत्र मी।

विरहदशा

बोलल्या जाईचना, सांगल्याविण राहवेना।
विशाल हे आयुष्य सखे, तुझ्याविण जगवेना।

गातात पक्षी, पानफुले, गाई आसमंत सारे,
स्रुष्टीचे हे गीत मजला, तुझ्याविण ऎकवेना।

चोचीत चोच घालूनी, खायचो एकेक दाणा,
समोर मझ्या पक्वान्न पण घास गळी उतरेना।

कैक केलेत पार मी, डोंगर तुझ्यासोबती,
एकटयाने पण अता माझे, पाऊलही उचलेना।

कळतात का तुज भाव माझे, कळतात का मझ्या व्यथा?
जिवघेणी विरहदशा ही, मज सखे सोसवेना।

अध्यात्माच्या हिंदोळ्यावर

अज्ञाताच्या पलीकडील, चंद्रलता मज खुणाविते।
मंद प्रकाशी किरणसखी ती, मज जवळ यावया डिवचते॥
झपाटून त्या गुढस्पर्शाने, झर्रकन मी पुठे सरसावतो।
मायेचे कुंपण काटेरी, बाजू सारण्या स्पर्शतो॥
वास्तवतेचा प्रचंड थारार, थरकापून मी मागे होतो।
झपुर्झत्वाचे ज्ञान नाहिसे, अज्ञानात मी पुन्हा नहातो॥
त्रिशंकु ही स्थिती मनाची, कसा बरे मी बाजूस सारू?
कसा जगू? मी कसा जगू?

तपास मझ्या भंग करण्या, मायामेनका नाच करते।
अद्वैतओढी पतंगाची या, पुन्हा पुन्हा डोर मागे खेचते।
अथांग सागर मेघ बनूनी, असाच कधीतरी बरसतो।
तो मोत्यांचा पाऊस मी, चातकचोचीने पीऊ पहातो॥
येता येता चोचित मोती, मध्येच का मग मेघ आटतो।
तुष्णाकित चातक बिचारा, आशाळभूत पुन्हा तसाच बघतो॥
झेपावणाय्रा मनाचे या, घरट्यामधेच का प्राणपाखरु?
कसा जगू, मी कसा जगू?

अशीच कितीदा वीज चकाकते, आलिंगन द्यावया हात देते,
रसरसलेल्य इंद्रधनूतून, गुढ ध्वनीने बोलाविते॥
कसला अमानुष सुगंध फेरुनी, मज पाशात ती आवळते,
मीही तसाच आवेगाने अभावित पुढे सरसावतो।
मदनाच्या आवेगाने त्या अज्ञातरतिला मिठी मारतो॥
पण का मध्येच सारे जलबिंदू, होती जळजळीत अग्नीफुले?
विरून जाते आग सर्व ती, राख बनून मी वापस येतो॥
ना ओला ना सुकलेला मी, ग्रिष्म पावसात कसा जळू?
कसा जगू? मी कसा जगू?

अध्यात्माच्या वेळुबनातूनी, शीळ फुंकित वारा येतो।
स्वरलहरींच्या नादासरशी, मज कसलातरी संदेश देतो॥
नदीचाही अवखळ निर्झर, खळबळ मनात उठवून देतो।
वहीवाटेवर उगमाकडच्या खुणेनेच मज जावया सांगतो।।
मीही भराभर धावत सुटतो, कैलासाचे शिखर गाठतो।
हिमशिखरे बघूनी ऊंचऊंच ती, मनातल्या मनी मी हर्षतो॥
पुन्हा खेळी ती कशी जीवघेणी, कुणितरी मजसंगे खेळतो।
क्षणात पुन्हा नदीकाठी मी, स्वत:च मग एक प्रश्न बनतो।।
पिकलेले हे पान मनाचे, वय्रासरशी किती हलू?
कसा जगू? मी कसा जगू?

असाच कितीदा शिखर गाठूनी, क्षणांत का मी तळास जातो?
कधी बसूनी विचार करतो, त्यासच कधी मी भाग्य मानतो।
पण तगमग तरी ती संपत नाही, त्रुष्णा कधीच भागत नाही।
झपाटूनी मी पुन्हा-पुन्हा, वाळवंटी असाच सागर शोधितो।।
कसे बरे हे संपवू सारे, मध्येच पुन्हा मी विचार करतो।
शिखंडी हि बनत नाही, कधी प्रक्रूती, कधी प्रव्रूत्ती बनतो॥
असेच होते पुन्हा-पुन्हा अन् असाच मी झुरून मरतो।
ना पोहतो कधी तरंगासवे अन् कधीच ना मी तळास जातो॥
असाच दिवस अन् रात्र बनुनी, जीवनभर मी कसा राहु?
कसा जगू? मी कसा जगू?

संपुर्ण समर्पण

ये सखे मज लिपटुन जा,
तुझे सर्वस्व मज देऊन जा।
रस माझ्या ओठांचा ओठांनी शोषूनी,
मज प्रेमात चिंब भिजवून जा।

तुझे रोम-रोम होऊ दे रोमांचीत,
होऊ दे तुझ्या सर्व व्रूत्तींना पुलकीत,
तोडूनी बंध सारे मला घट्ट बिलगीत,
तू हलकेच मझ्यात मिसळून जा।

होऊ दे स्पर्श माझा तुझ्या सर्वांगाला,
भेटू दे श्वास माझा तुझ्या श्वासाला,
घर्षू दे माझे शरीर तुझ्या शरीराला,
मज कामशास्र तू शिकवून जा।

उमटू दे चुंबनांचे ठसे सर्वांगावर,
नसू दे वस्त्रांचा ताबा शरीरावर,
तुझे अनाव्रुत्त शरीर माझ्या शरीरावर,
हरुवाळ तू झोकून जा।

जे न जाणी बंध, म्हणती त्यास प्रेम,
उधळे बेफाम जे, म्हणती त्यास प्रेम।
संपुर्ण समर्पण.... नाव त्याचेच प्रेम,
पाठ प्रेमाचे मजकडून शिकून जा।

मज जगू द्या

धुंदीत मज जगू द्या, कैफात मज जगू द्या ।
अश्रुंत पावसाच्या आगीत मज जगू द्या ।

आकाशी वेदनेच्या आभाळ दाटलेले,
सरींत या दु:खांच्या, चिंबीत मज जगू द्या ।

मुक्ती नकोच मजला, ना दर्शन ईश्वराचे,
तिच्याच फक्त तिच्या, ध्यासात मज जगू द्या ।

नसलो जरि काबिल मी, अंतिम त्या सुखाच्या,
मधुदंशी या स्म्रूतींच्या, पाशात मज जगू द्या ।

नाही इथे जरी ती अन आयुष्य भकास सारे,
बेधुंद त्या क्षणांच्या, अर्थात मज जगू द्या ।

काहीच अर्थ नाही, गुंत्यास या शब्दांच्या
वैराण नि:शब्दाच्या, अर्थात मज जगू द्या ।

सुन्या सुन्या स्वरांचे, उठले अता कल्लोळ,
सुनसान शांततेच्या, नादात मज जगू द्या ।

जीवन....... एक अग्नीकुंड!

जीवन.......
एक अग्नीकुंड-
भकभकतं ।
त्यातील ज्वाला.....
पहातात सगळ्यांना
गिळायची वाट ।

असतात संबधी अडचणीच्या
असलेल्या प्रत्येकास
टाकाव्या लागतात समिधा तिच्यात
इच्छेच्या, अकांक्षेच्या, स्वप्नांच्या !

आणि समिधाच संपल्या तर.....?
स्वत:च बनून समिधा.....
घ्यावी लागते उडी-
त्या नरभक्षक अग्नीकुंडात ।

जीवन.....
एक अग्नीकुंड-
ज्याने जळतही नाही पुर्ण!
तसच पोळलेलं, लक्तरलेलं शरीर घेऊन,
जळत-जळत जगावं लागतं....
मरेपर्यंत ।

ज्ञानदीप

तु चाल पुढे घेउनी
ज्ञानदीप हाती ।
पेटतील लक्ष-लक्ष दिप
तुझ्या सभोवती ॥

काय मर्यादांच्या तुझ्या
गातो रडगाणी ।
आठव तुझी जिद्द अन
कर याद इतिहासाची ॥

का भंग पावले
बाहू तुझे वज्ररुपी ।
होती तळ्पत तलवार ज्यात
तुझ्या सामर्थ्याची ॥

का होतसे आजही
मान तुझी खालती ।
लागली तुला नजर सांग
कुण्या भ्याडाची ॥

का मन हे झाले दगड
जेथे तरंगे होती उत्साहाची ।
परी घे समजून शेवाळही
फक्त साचते स्तब्ध पण्यामाजी ॥

चल उचलुन पुन्हा
अभिमानाने मान तुझी वरती।
तु जन्मा आला राजा म्हणून
तुला कसली रे भिती ॥

पुन्हा तळपू दे रणांगणी
तलवार तुझी भवानी ।
कर कलम शंभर शिरांना
एकच तुझ्या वारी ॥

मुंबई

छोट्या छोट्या माण‍सांची
छोटी छोटी मुंबई ।

मोठ्या मोठ्या मुंबईतील,
मोठी मोठी घरे ।

मोठ्या मोठ्या घरातील,
छोटी छोटी गाळे ।

छोट्या छोट्‍या गाळ्यातील,
छोटी छोटी माणसे ।

छोट्या छोट्या माणसांचे,
छोटे छोटे जीवन ।

छोट्या छोट्या जीवनातील,
रोजरोजचं मरण ।

छोट्या छोट्या माणसांचे,
छोटे छोटे मरण ।

छोट्याशाच स्मशानात,
छोटे जळते सरण।

- प्रशेन ह. क्यावल